You are currently viewing NRI – Non Required Indian

NRI – Non Required Indian

Title : NRI – Non Required Indian.
By Satish

देशात अडकलेले मजूर हे Non-Required Indians आहेत काय ?

हा आहे गडचिरोली शहराच्या मध्यभागी असलेला शहरातील सर्वांत मोठा इंदिरा गांधी चौक. आणि ही सगळी मंडळी आहे चंद्रपूरच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची नवी इमारत बांधणारे बांधकाम मजूर. लॉकडाउन नंतर हे सगळे चंद्रपूरातच अडकलेले होते. या इमारतीचे बांधकाम करणारे साधारण ३०० मजूर काल गडचिरोलीत मजल दरमजल करत दाखल झालेले आहेत. हे सगळे शापूरजी पालोनजी कंस्ट्रक्शन कंपनीचे मजूर आहेत. या सर्वांना कंपनीने आतापर्यंत बांधकाम साइटवर कोंडून ठेवत काम करवून घेतल्याचा आणि या विरुद्ध बोलणाऱ्या मजुरांना जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गंभीर आरोप अनेक मजुरांनी कंपनीच्या कर्मचाऱ्यावर केला आहे.

झारखंडला जाण्यासाठीची व्यवस्था गडचिरोलीला केली आहे असं कोणीतरी सांगितल्याने हे सगळे मजूर प्रचंड धावपळीत गडचिरोलीत पोहचले. नेहमीप्रमाणे ही अफवा निघाली आणि इथे तसली कुठलीही व्यवस्था आज सकाळपर्यंत तरी नाही. यांच्यापैकी काही मजूर कालच पायी पुढे निघालेत, काहींनी वाट्टेल त्या किंमतीत टेम्पो करून छत्तीसगड सीमेवर जाण्यासाठीचा मार्ग धरला तर बरेच आत्ताही गडचिरोलीमध्येच आहे. झारखंड प्रशासनासोबत काम करणाऱ्या एका मित्रासोबत कालपासून बोलणे चालू असून तो त्याच्या बाजूने या लोकांच्या जाण्यासाठी व्यवस्था करण्याबाबत धडपड करतो आहे. पायदळ निघालेल्या काही मजुरांना काल गडचिरोली प्रशासनाने थांबवून घेतले पण यांना झारखंडला जाण्यासाठीची व्यवस्था होईल की नाही याबाबत प्रशासनाकडून अजून कुठल्याही स्पष्ट सूचना नाहीत. त्यामुळे सगळेच मजूर प्रचंड गोंधळलेल्या अवस्थेत गडचिरोलीतच आहेत.

परदेशात अडकलेल्या श्रीमंत भारतींना प्रचंड तत्पत्तेने विमानाने फुकटात भारतात आणणार, अब्जाधीश उद्योगांची हजारो कोटीची कर्ज माफ करणार उदार अंत:करणाचं मायबाप सरकार देशात अडकलेल्या बेरोजगार मजुरांना घरी सोडण्यासाठीची पर्यायी व्यवस्था तत्परतेने का उभारू शकत नाही ?

विदेशात अडकलेले NRI (Non-Resident Indian) हे महत्वाचे भारतीय आणि देशात अडकलेले मजूर हे Non-Rrequired Indians आहेत काय ?

प्रश्न परदेशातील भारतीयांना केलेल्या मदतीचा नाहीच आहे, ते सरकारने नक्कीच करावे. प्रश्न हा देशात अडकलेल्या गरीब मजुरांना दिल्या जाणाऱ्या सावत्र वागणुकीचा आहे.

सतीश

Leave a Reply

thirteen + 3 =